विधवा, सामाजिक परिस्तिथी आणि तुमची त्यातील भूमिका

वनिता,  बसमध्ये ओळख झालेली एक मैत्रीण, एक शिक्षिका आहे.  ऑफिसला जाताना रोज थोड्याफार गप्पा होतात तिच्याशी. रोज प्रसन्न चेहर्याने गुड मॉर्निंग करणारी वनिता आज मात्र काहीशी दुःखी दिसली. मी तिला कारण विचारलं तर  म्हणाली, “आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे.मला त्यासाठी निमंत्रण नाही, एरवी माझ्याशी सगळे खुप छान वागतात. पण यावेळी मला निमंत्रण नाही दिले, मी विधवा असल्यामुळे कदाचित त्यांना पेच पडला असावा.”

वनिताच्या या वाक्याने माझ्यापुढे आपल्या सुशिक्षित(?) समाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. खरतर नवरा गेल्यावर तिने अतिशय खंबीरपणे स्वतःला सावरुन घरची जबाबदारीही तितक्याच् समर्थपणे सांभाळली होती, तिला येणाऱ्या अडचनींवर मात करत जगत असताना हे नाकारलेपण तिच्या वाट्याला का?

वनिता सारख्या असंख्य स्त्रिया आपल्या समाजात अशा प्रकारचे उपेक्षित जीवन जगत आहेत. जोडीदाराचा मृत्यु ही नक्कीच दुःखद घटना आहे, पण तो त्या स्त्रीचा अपराध असल्या सारखी वागणुक तिला आयुष्यभर मिळते किंवा दिली जाते. त्यातूनही सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभात, धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रियांना जाणुन बुजुन सहभागी होऊ दिले जात नाही. कितीतरीवेळा हळदी-कुंकवाच्यावेळी उभारलेले हात ती बाई विधवा असल्याचे समजताच मागे घेतले जातात. पूजाविधि करताना त्यांना मागे ठेवले जाते, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर एक अलिखित बंधन लादले जाते. तिने कसे रहावे, कसे वागावे आणि अशा कितीतरी गोष्टींवर नियम लावले जातात.

सौभाग्य म्हणजे नेमकं काय? हळदी कुंकु लावण्याचा अधिकार विधवा स्त्रियांना का नसावा? मंदिरात किंवा देवघरात देवांना स्पर्श करण्यास त्यांना बंधन का? विशिष्ठ रंग वापरण्यास मनाई कशासाठी? एखाद्या विवाहितेला ती विवाहित असल्याचे दिसण्याचा आणि तिच स्त्री विधवा झाल्यावर तिला विधवा दिसण्याचा अट्टाहास का? कोणतीही स्त्री तिच्या आवडीनुसार वेशभूषा आणि साज शृंगार का नाही करु शकत? ही बंधनं पुरुषांना नाहीत मग स्त्रियांना तरी कशासाठी? नवरयाच्या मृत्युमुळे आधिच खचलेल्या स्त्रीला या सामाजिक प्रथांच्या नावाखाली मानसिकरित्या अजुनच दुबळी का केली जाते? नवरयाच्या मृत्युमुळे तिच त्याच्याशी किंवा इतरांशी असलेलं नातं तर बदलत नाही, मग सौभ्यागवती आणि श्रीमती कशासाठी लावायच? आपण कधी माणुस म्हणून या गोष्टींचा बारकाइने विचार केलाय का? रुढी आणि परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या या अनुचित प्रथा बदलण्यासाठी समाजात सगळ्यानीच प्रयत्न करण्याची गरज आहे, परंतु यामधे पुरुषांच्या सहभागाची देखील गरज आहे.  

पुन्हा एकदा गरज आहे ती समाजातील पुरुषांनी संघटित होण्याची आणि आपल्या घरात, शेजारी, समाजात असणाऱ्या अशा स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाहन देण्याची. याचसाठी गरज आहे ती पुरुषांकडून काही ठोस पावलं उचलण्याची. आजची परिस्थिति लक्षात घेता खालील काही पावलं पुरुषांकडून नक्कीच उचलली जाऊ शकतात आणि ती उपयोगी पडु शकतील.

१) घरातून पाठींबा:-

कोणत्याही स्त्रीचे आत्मबळ वाढविण्यामधे तिच्या कुटुंबियांचा खुप मोठा हातभार असतो. घरच्यांनी जर तिला आधार आणि ठाम पाठींबा दिला तर ती या सगळ्यातून स्वतःला सावरु शकेल. तिला पूर्वीप्रमाणेच दैनंदिन आयुष्य जागायला देणे. लावणे, जसे की वेशभूषा, टिकली, कुंकु, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या तिच्या आवडीप्रमाणे तिला वापरु देणे. केवळ नवऱ्याचा मृत्यु झाला म्हणून या गोष्टी तिला वर्ज्य करु नयेत. याबाबतित तिची आवड महत्वाची आहे. तिचे बाह्यरूप कसे असावे किंवा तिने कसे दिसावे हे ठरविण्याचा हक्क सर्वस्वी तिचा आहे आणि तो तिला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. धार्मिक कार्य, समारंभात तिला तितक्याच् आपुलकिने सहभागी करुन घेण्यासाठी, घरातील निर्णयांमधे तिचे विचार आणि मते याला स्थान देणे यासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टींकडे वैयक्तिक पातळीवर लक्ष देऊन बदल घडवून आणता येईल.

२) सार्वजनिक हळदीकुंकु:-

नवर्याच्या मृत्यूनंतर अनेक अडचणींवर मात करुन, स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करुन समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कितीतरी स्त्रिया आहेत, अशा स्त्रियांसाठी विशेष हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जाऊ शकतात. अशा सक्षम महिलांसाठी पुरुषांच्या पुढाकाराने अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित केले जाऊ शकते. वस्ती, गल्ली, सोसायटी यासारख्या ठिकाणी असे कार्यक्रम घेऊन समाजाच्या मानसिकतेमधे बदल करवून आणण्याचे काम आजची तरुण पिढी आणि पुरुष वर्ग नक्कीच करु शकते.

३)सामाजिक संस्थांचा सहभाग:-

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जनजागृतीचे काम केले जाऊ शकते, जेणेकरून अशा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला जाऊ शकतो. समाजप्रबोधनपर पथनाट्य, मिडिया, समुपदेशन या माध्यमांकडे बराच बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असते. या माध्यमांच्या मदतीने लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचे काम सुरु केले जाऊ शकते.

४) न्यायिक आणि धार्मिक बदल:-

धर्म किंवा समाज रचनेमुळे जे काही निर्बंध किंवा नियम विधवा स्त्रियांवर लादले आहेत ते बदलण्याची गरज आहे. तसेच कायद्यामधेही काही तरतुदी जसे की नवरयाच्या मृत्युनंतरही नावापुढे पूर्वीप्रमाणेच ‘सौ’ लावणे, टिकली, मंगळसूत्र इत्यादी अलंकार तिच्या इच्छेनुसार वापरु देणे, धर्मकार्य आणि पूजा अर्चेमधे तिला समान हक्क इत्यादी करणे अत्यंत गरजेचे आहे.

विधवा असणे हा गुन्हा नाही. त्यांनाही तितक्याच् समानतेने आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात हे जे घडतंय ते बदलण्याची जबाबदारी त्या स्त्रियांची नसून, पुरुषांची, इतर स्त्रियांची, समाजाची आणि या व्यवस्थेची आहे. पण समाज तेंव्हाच बदलेल जेंव्हा आपण प्रत्येक जण या समस्येतील आपली भूमिका जाणून घेऊ. आपण काळजी घेऊ की आपण एक व्यक्ती म्हणून या समस्येला खात पाणी तर नाही घालत?