स्त्री-पुरुष समानता आणि मी

Shivraj_Pudage_ActionforEquality_Premnagar

 

माझे नाव शिवराज. मी २१ वर्षांचा आहे व पुण्यामधील प्रेमनगर या वस्तीमध्ये राहात आहे. आपल्या देशातील इतर अनेकांप्रमाणेच मीही अश्या ठिकाणी रहातो, जेथे रस्त्यावरील लैंगिक हिंसा, घरांतर्गत होणारी हिंसा व बालविवाह ही लांबची बाब नव्हे तर डोळ्यांना दिसणारे रोजचेच वास्तव आहे.

मी आमच्या वस्तीमध्ये, चौकात उभा राहणारा टपोरी पोरगा म्हणून ओळखला जायचो. एखादीतरी शिवी आल्याखेरीज माझ्या तोंडामधून वाक्यही बाहेर पडत नसे. दुर्दैवाने मुलींकडे पाहण्याची माझी दृष्टीसुद्धा योग्य होती असे मी म्हणणार नाही. कधी समोरून एखादी मुलगी जात असेल तर मी आणि माझे मित्र तिला पाहून शिट्ट्या मारायचो. ती मान खाली घालून, काही न बोलता निघून जात असे. मुलींच्या या गप्प बसण्यामुळे आमच्या वागण्याला प्रोत्साहनच मिळायचे. त्यांना या वागण्याचा किती त्रास होत असेल याची मला कणभरही जाणीव नव्हती.

आज मात्र मी एक पूर्ण वेगळी व्यक्ती आहे आणि याचे श्रेय मी इक्वल कम्युनिटी फाउंडेशनला  (ईसीएफला) देतो.

सहा वर्षांपूर्वी मी असाच माझ्या मित्रांसोबत चौकामध्ये उभा असता, विशीतला एक तरुण आमच्यापाशी आला आणि त्याने आम्हाला किशोरवयीन मुलांसाठीच्या त्यांच्या कार्यक्रमातील सत्रामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.

खरे तर मी आमंत्रण स्वीकारले तेव्हाच मनाशी ठरवले होते की हे सत्र कंटाळवाणे वाटू लागल्याबरोबर लगेचच त्यामधून बाहेर पडायचे. पण तसे झाले नाही. मला ते सत्र इतके आवडले की तेव्हापासून आजतागायत मी त्या कार्यक्रमाचा भाग आहे आणि तो तरुण- आमचे रमेशसर – आजही माझे मार्गदर्शक आहेत.

हे सत्र ईसीएफच्या ऍक्शन फॉर इक्वॉलिटी या कार्यक्रमामधील होते. ह्या कार्यक्रमाद्वारे १३ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांसोबत महिलांविरुद्ध होणारी हिंसा व भेदभाव थांबवण्यासाठीचे काम केले जाते. या कार्यक्रमातील एक सहभागी म्हणून मी अश्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यांबद्दल विचार केला, ज्यांची आयुष्ये माझ्या आयुष्याशी जवळून निगडित असूनदेखील त्यांच्याबद्दल मी आजवर कधी विचारच केलेला नव्हता. ही आयुष्ये म्हणजे माझ्या जवळच्या स्त्रियांची आयुष्ये.

त्याआधी मी अजिबात घरी थांबत नसे. शाळेतून परत आल्याआल्या मी बाहेर भटकण्यास निघायचो आणि घरी परतायचो ते थेट मध्यरात्रीच. घरीसुद्धा टीव्हीच पाहत बसायचो आणि कोणाशीच काही बोलायचो नाही. माझ्या बहिणीशीही मी कधी आदराने वागलो नव्हतो. रमेश सर (आमचे मेंटॉर/ मार्गदर्शक ) आणि  ऍक्शन फॉर इक्वॉलिटी कार्यक्रमातील सत्रे यांनी माझ्या स्त्रियांप्रतीच्या दृष्टिकोनास प्रश्न करण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून मी माझ्या वस्तीमधील आणि शक्य झाल्यास संपूर्ण जगामधीलच महिलांविरुद्धची हिंसा आणि भेदभाव थांबवण्यासाठी ईसीएफच्या या कार्यक्रमाचा हिस्सा झालो आहे.

अन्यायकारी लिंगभावाच्या नियमांना आव्हान करणे याचा अर्थ माझ्यासाठी आज माझ्या आतवर रुजलेल्या पितृसत्तेला आव्हान करणे असा आहे.

आता मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट, मी स्वतःला लिंगभाव समानता मानणारा पुरुष म्हणून कसे घडवले त्या प्रवासाचीच गोष्ट आहे.

या कार्यक्रमातील सत्रांमध्ये आम्हाला दिलेली पहिली कामगिरी होती, महिलांच्या दैनंदिन कामांची यादी तयार करण्याची. पाणी भरण्यापासून, भांडी घासणे, कामासाठी बाहेर जाणे, भाजी आणणे, स्वयंपाक…. ही यादी संपता संपत नाही. मी चकित झालो. दिवसभरामध्ये मी फक्त कॉलेजला जातो आणि तरीही थकून जातो परंतु माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया किती थकत असतील याचा मी अंदाजही केलेला नव्हता. त्याहूनही पुढे जाऊन पहिले तर मला अधून मधून सुट्ट्या तरी मिळतात. परंतु ह्या सर्व कामांना कधीही सुट्टी नसते. उलट माझ्या सुट्टीच्या दिवशी घरी असलो म्हणजे मी खाण्यासाठी विशेष काहीतरी तयार करण्याचे फर्मान सोडत असे.

हे सगळे लक्षात आल्यावर मीसुद्धा सर्व जबाबदाऱ्या वाटून घेण्याचे ठरवले. आता मी वाण्याच्या दुकानात जातो, भाज्या धुवून व चिरून ठेवतो, स्वतःचा बिछाना स्वतःच तयार करतो व पाणी भरतो.

जेव्हा मी महिलांची छेड काढत असे तेव्हा मला जाणीव नव्हती की हा लैंगिक अत्याचार आहे. आमच्यासाठी ती निव्वळ ‘गम्मत’ होती पण  त्याचा महिलांवरती काय परिणाम होतो हे जेव्हा रमेशसरांनी मला सांगितले तेव्हा मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झाला. जेव्हा आम्ही मुलींना त्रास देत असू तेव्हा त्या त्यांच्या पालकांकडे तक्रार करायच्या आणि आम्हाला काही म्हणायचे दूरच,  पालक त्यांचीच शाळा बंद करून त्यांना घरी बसवत असत. मी शाळा- कॉलेजमध्ये जात असता माझ्या वयाच्याच मुलींचा शिक्षणाचा हक्क मात्र नाकारला जात होता. मी करत असलेल्या लैंगिक अत्याचारामुळे त्यांना शाळा सोडावी लागत आहे याचे मला अत्यंत वाईट वाटले आणि तेव्हापासून मी मुलींची छेड काढणे बंद केले.

रमेश सरांचा एक प्रश्न माझे डोळे उघडणारा होता. त्यांनी विचारले, “जर का कोणी तुझ्या बहिणीची छेड काढली तर तू काय करशील?” मी लगेच उत्तर दिले, “मी इतर मुलांना साथीला घेऊन त्या मुलास बदडून काढीन.” याचाच अर्थ: जेव्हा मी एखादया मुलीची छेड काढतो तेव्हा तिच्या भावास मलाही मारण्याचा हक्क आहे! रमेश सरांनी विचारले, “हिंसेचे हे चक्र तुला योग्य वाटते का?” नाही! मला ते योग्य वाटत नव्हते. त्याच वेळेस मी माझे वर्तन बदलण्याचे ठरवले.

आमच्या वस्तीमधील आणखी एक खेदजनक बाब म्हणजे बालविवाह.  मी कॉलेजमध्ये शिकतो आणि आमच्या परिसरातील माझ्या वयाच्या बहुतेक सर्व मुलींची लग्ने झाली आहेत किंवा होऊ घातली आहेत. जेव्हा केव्हा मी त्या मुलींच्या पालकांशी याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा जवळपास प्रत्येकजण असेच म्हटले की “आमच्या मुलीचे आता लग्नच लावून द्यायचे असता तिच्या शिक्षणावर पैसा वाया घालवण्याची गरजच काय आहे?” मला ही मानसिकता बदलायची आहे. पालकांची वृत्ती त्यांच्या मुलीच्याच बाबतीत संशयी आणि संकुचित असते. जर का ती ‘चुकीच्या व्यक्तीसोबत’ पळून गेली तर काय करायचे? असा अविश्वास न बाळगता मला पालकांनी त्यांच्या मुलींवरती विश्वास ठेवायला हवा आहे. जर त्यांनी तो ठेवला तर मुलींना शाळा सोडण्याची किंवा लवकर लग्न करण्याची गरजच पडणार नाही.

जर स्त्रियांना त्यांच्या अधिकारांसाठी ठामपणे उभे राहण्यास सक्षम बनवले गेले तर त्या त्यांच्या पालकांना सांगू शकतील, की त्या ओझे बनून नव्हे तर स्वतः पैसे कमावून, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. अन मग पालक त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची शक्यता जास्त आहे. असे ठामपणे स्वतःचे मत मांडणाऱ्या मुलींच्या बाजूने मी उभा आहे.

मी आज माझ्या वस्तीमध्ये लिंगभाव समानतेचे काम करणारा स्वयंनिर्धारित नेता आहे. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, शेजारी यांच्यासोबत चर्चेच्या माध्यमातून, लिंगभाव समानतेवर आधारित वास्तव निर्माण करण्याचे काम मी करत आहे.

आम्ही मित्रमंडळी हुंडा, घरगुती हिंसा, व्यसनांविरुद्ध व स्त्रियांच्या हक्कांसाठी जनजागृती करणारी पथनाट्ये करतो. अधिककरून स्त्रिया आमची पथनाट्ये पाहण्यासाठी येतात. त्या आम्हास या नाटकांचे आणखी प्रयोग करण्यास सांगतात. त्या आम्हास नवनवे विषय सुचवतात. त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या विषयांवरील सादरीकरणे त्यांना पाहायची असतात. घरी गेल्यावर त्या ह्या नाटकांविषयी त्यांच्या पती व मुलग्यांसोबत चर्चा करतात.

Shivraj_Pudage_ActionforEquality_Play

माझ्या जोडीने माझ्या घरातील वातावरणही बदलू लागले आहे. एकदा माझे वडील वैतागलेल्या मनस्थितीत घरी परत आले. त्यादिवशी नेमकी भाजी अळणी झाली होती. संतापून त्यांनी आईवरती ओरडण्यास सुरुवात केली. मी उठून त्यांना थांबण्यास सांगितले. मी म्हणालो,“शांत व्हा, अशा गोष्टी घडू शकतात.” मी त्यांना स्वतः मीठ घेण्यास सांगितले. आश्चर्य म्हणजे ते शांत झाले आणि त्यांनी माफीदेखील मागितली. त्या दिवसापासून त्यांचे-आमचे आणि त्यांचे आणि आईचे नातेदेखील अधिक मित्रत्वाचे झाले आहे. मी त्यांना रमेशसरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. स्त्रियांना किती कष्ट घ्यावे लागतात त्याबद्दल सांगितले. ते ऐकून वडीलदेखील विचारात पडले.

पूर्वी माझी आई एकटी सात वाजता उठून घरातील सर्व कामे करू लागायची, आता तेही लवकर उठतात आणि तिच्यासोबत पाणी भरतात. मला याचा आनंद वाटतो.

 

अधिकाधिक पुरुषांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची आणि स्वतःच्या वर्तणुकीविषयी चिंतन करण्याची गरज आहे. भावी नागरिक म्हणून आपण मुले स्त्रियांबाबतीत काय वागतो आहोत याविषयी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्य व निर्णयांस पाठिंबा द्यायला पाहिजे.