गटचर्चेदरम्यान आलेले अनुभव: Experiences from the Field

Supriya Sawant, a part of the Research, Development, and Evaluation team at Equal Community Foundation writes about her experiences from the field while engaging with boys in our communities in Pune.

आपणांस वारंवार असे ऐकण्यास मिळते कि आम्ही मुलगा आणि मुलीमध्ये काही फरक करत नाही दोघांनाही समान वागवतो, दोघांनाही शाळेत पाठवतो, एकसारखे खाण्या-पिण्यास देतो तसेच त्यांच्या सर्व गरजा समानतेने पूर्ण करतो. परंतु प्रत्यक्षात मात्र  मुलांना किंवा मुलींना कशा प्रकारची समानता हवी आहे याबाबत कोणीही विचार करताना दिसत नाही. मुलींसोबत बोलताना असे समजले कि, मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलताना जरी दिसले तरी संशय घेणे, त्यांचे शिक्षण बंद करणे, घराबाहेर जाणे बंद करणे अशा अनेक समस्यांना मुलींना सामोरे जावे लागते. मुलींना असेही  वाटते येते कि, मुलांबरोबर बोलणे, मैत्री करणे चुकीचे आहे का? जर चुकीचे असले तरी दोष एकट्या मुलीलाच का? यामध्ये मुलाला काहीच बोलले जात नाही किंवा यामुळे त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मग सगळी बंधने मुलींनाच का? मुलीनेच सगळे सहन का करायचे? फक्त मुलगी आहे म्हणून?

मी जेव्हा जेंव्हा वस्तीमध्ये जाते व वस्तीमधील लोकांशी संवाद साधते तेव्हा आपल्या मुलाबद्दल व वस्तीबद्दल लोक अगदी मनमोकळेपणाने बोलतात. गटचर्चेदरम्यान वस्तीतील समस्यांबाबत बोलताना वस्तीतील लोकांनी सांगितले कि, आमच्या वस्तीमध्ये एकही समस्या नाही, वस्तीमध्ये मुली / महिला सुरक्षित आहेत, त्या कोणत्याही वेळेला एकट्या घराबाहेर बाहेर जाऊ शकतात, मनाप्रमाणे वागू/फिरू शकतात इत्यादी. पण प्रत्यक्षात मात्र मुलींबरोबर झालेल्या गटचर्चेमधून असे समजले कि, रात्री ७ नंतर देखील मुली घराच्या बाहेर एकट्या पडू शकत नाहीत. कारण वस्तीमध्ये होणारी छेडछाड! मुलींना पाहून शिट्ट्या वाजवणे, कंमेंट्स करणे, गाणी म्हणणे अशा अनेक प्रकारच्या छेडछाडीला मुलींना सामोरे जावे लागते. कधी मुलींनी याला विरोध केला किंवा प्रतिउत्तर दिले तरी मुलींनाच दोषी ठरविले जाते. शाळा किंवा कॉलेज बंद करणे, लवकर लग्न लावून देणे, कोणत्याही गोष्टीवरून संशय घेणे, मानसिक त्रास देणे अशा अनेक परिणामांना मुलींना सामोरे जावे लागते. 

“इक्वल कम्युनिटी फाउंडेशनचा असा विश्वास आहे की पुरुष या समस्येचा भाग नाहीत  परंतु प्रत्येक पुरुष अशा समस्येच्या निवारणाचा एक भाग नक्कीच असू शकतो. ” इक्वल कम्युनिटी फाउंडेशन च्या ऍक्शन फॉर इक्वालिटी कार्यक्रमात मुले सहभागी झाल्यानंतर मुलांच्या वर्तनात बदल दिसून येतो तसेच पालक देखील सांगतात की त्यांना मुलाच्या वागण्यात बदल जाणवतात जसे की मुलगा  सर्वांशी आदराने बोलतो, घरातील जबाबदाऱ्या स्वतःहून घेतो, अभ्यासाकडे लक्ष देतो अशा अनेक प्रकारचे बदल सहभागी मध्ये दिसून येतात. इक्वल कम्युनिटी फाउंडेशनच्या ऍक्शन फॉर इक्वालिटी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुले वेगवेगळ्या समस्यांवर वस्तीमध्ये ऍक्शन इव्हेंट सादर करतात. यामध्ये नाटक, पथनाट्य, पोस्टर प्रेझेन्टेशन, रॅली अशा वेगवेगळ्या माध्यमांतुन कार्यक्रम सादर करुन वस्तीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात . यासाठी होणाऱ्या गटचर्चेच्यावेळी मुलांनी वस्तीमध्ये होणारी छेडछाडीची समस्या मुली आणि महिलांकडून जाणून घेतली. मुलांनी स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलने गरजेचे आहे तरच अशा प्रकारच्या समस्यांना आळा बसेल अस मत मुलांनी नोंदविले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुलांनी कृती आराखडा तयार केला. अशा प्रकारच्या समस्यांवर वस्ती मध्ये जनजागृती करू, यावर नक्की काम करू व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे मुलांनी तेथे उपस्थित असलेल्या महिला व मुलींना सांगितले.