मर्दपणा म्हणजे नेमके काय?

मर्दानगी म्हणजे काय? मर्द म्हणजे कोण? कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे मर्दानगीच्या चौकटीत बसतील? या प्रश्नांचा आजवर मी खूप विचार केला. समाजाकडून याची उत्तरं ऐकू येत होती ती अशी की मर्द म्हणजे महिलांना मुठीत ठेवणारा, व्यसने करणारा, बायकोला मारहाण करणारा, दारू पिऊन वेगाने गाडी चालवणारा, आवडी-निवडींमध्ये पुरुषी ठराविकपणा असणारा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर रिस्क घेणारा, म्हणजे थोडक्यात रफ अँड टफ! मग मला प्रश्न पडायचा, जो ह्या चौकटीत बसत नाही अशा पुरुषाला काय म्हणायचे?

नंतर लिंगभाव समानतेचे काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्या विषयांवर बोलत असता मला वाटले, प्रत्येक पुरुषाला स्वतःची मर्दानगी सिद्ध करण्याचा किती ताण असतो! आणि हा आपला मर्दपणा जपत सर्व पुरुष जगतही असतात. आज किती टक्के पुरुष हे सर्वांसमोर रडतात अथवा आपल्या अडचणी सांगतात, घरातील कामे खुलेआम करतात, स्व-आवड, छंद जोपासतात? मर्दानगीच्या ओझ्याखाली ह्या साध्यासाध्या गरजेच्या गोष्टींनाही पुरुष मुक्त असतील तर ह्या विषयी विचार करायची गरज वाटते.

शिवाय त्याउलट जे पुरुष ह्या प्रकारच्या मर्दानगीचा मुखवटा घालून फिरणाऱ्या पुरुषांसारखे नसतात, त्यांना समाजाकडून  खूप संकुचित  प्रकारची वागणूक दिली जाते. हे  मी माझ्या रोजच्या जीवनात खूपदा अनुभवतो.  विविध लिंगभावाचे नियम तोडण्याचा प्रयत्न करत असताना, मला घरातल्यांकडून अथवा बाहेरून अनेक प्रकारचा विरोध दर्शविला जातो.  विरोधाचे विविध मार्ग आहेत, समजून न घेणे, वाद घालणे अथवा काही गोष्टी  मान्य असूनही त्या अमान्य करणे असे अनेक. हे मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगू शकतो.

मी कथक नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी घरातून मला विरोध होता. ‘ आता हे काय नवीन नाटक? आता एवढंच करायचं राहीलं होतं का? ‘ म्हणजेच  ‘मुलींच्या कला’ ह्या मुलाने का कराव्यात असा त्यांचा प्रश्न होता. घरचेच नाही तर ,  शेजारचे लोक माझे घुंगरू पाहून देखील मला हसायचे, “मुलगी आहेस का कत्थक  शिकायला?” असे प्रश्न विचारायचे.

मलाही हे प्रश्न ऐकून हसू यायचं. मग त्यावर मी त्यांच्याशी लिंगभाव समानतेविषयी चर्चा करायचो पण त्यांना ती पटायची  नाही.  “पण कशाला?” “काहीही कशासाठी शिकायचं?” असेच त्यांचे प्रश्न असायचे.

बहुदा समाजामधे अशा प्रकारच्या कला ह्या फक्त मुलींकरीता असून त्या मुलींनीच शिकाव्यात असा खूप अट्टाहास असतो.  माझ्यासारखे अनेक पुरुष, मुले ह्या कलांकडे वळत नाहीत अथवा स्व-इच्छेचा  त्याग करतात. व् स्व-इच्छा मारतात.

मेहंदी काढणे, रांगोळी काढणे ह्या सारख्या माझ्या आवडीच्या कलांच्या बाबतीतही तेच. एखादा पुरुष मेहंदी किंवा रांगोळी काढत असेल तर ते खूप कुतूहलाने पाहणे, त्या व्यक्तीमध्येच काहीतरी उणीव आहे या अर्थाने पाहणे, असे खूपदा माझ्या बाबतीत घडताना दिसते. खूपदा मी रांगोळी काढत असता काही लोक नुसती मजा घेण्याच्या उद्देशाने पण चौकामध्ये जमा होतात कारण रोजच्या बघण्याच्या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळी घडामोड त्यांना दिसत असते परंतु ह्या सगळ्या  गोष्टी  कुठून येतात? याविषयी चर्चा करण्याची गरज मला आता जास्तच वाटते.

मुलांच्या जडण- घडणीचा महत्वाचा टप्पा म्हणजे घर. घरातून या सर्व गोष्टींना सुरुवात होतो. त्यामुळे मुलांवर घरामधून काय प्रकारचे संस्कार केले जातात तसेच कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते या विषयी अभ्यास करण्याचीही गरज वाटते. वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांचे सामाजिकीकरण होत असताना आपल्याला दिसते की आपण ज्या पितृसत्तात्मक समाजव्यवस्थेत वाढतो त्याच पद्धतीने आपण आपले विचार घडवत असतो व  मुलांवरही तेच बिंबवण्याचा प्रयत्न करतो.  यामध्ये  पालक, शिक्षक, आजूबाजूचा समाज, माध्यमे हे घटक देखील तेवढेच जबाबदार असतात.

माझा घरातून विरोध असतांनाही मी माझी आवड व कला यांची सांगड घातली व त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढला.  त्यामुळे मला खूप सामाजिक नियम माझ्या वैयक्तिक पातळीवर तोडता आले व काही वेळा वरती सांगितल्याप्रमाणे समाजातील घटकांकडून विरोध जाणवला, मस्करी केली गेली, खिल्ली उडवली  गेली तरीही मी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे खूप सखोल, चिकित्सक विचार करायला मदत झाली.

मी आज प्रतिप्रश्न करू शकतो, “कला ही कला आहे मग भेदभाव का असावा?” आज किती तरी पुरुष माझ्याप्रमाणे कला अथवा आवड जोपासतानाही दिसतात परंतु त्यांच्यासाठी कुठलाच प्लॅटफॉर्म नाही आहे. त्यांच्याशी बोलायला, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला खूप कमी लोक आहेत. त्यामुळे, मला हा लहानसा लेख लिहण्याची गरज वाटली.

शेवटी मी इतकंच म्हणीन की मर्दानगीचा ताण घेउन जगण्यापेक्षा स्वछंदी माणूस म्हणून जगणं महत्त्वाचं आणि त्या जगण्यात आपल्या भावनांसाठी मोकळी वाट असायलाच हवी.

– Jagdish Bhosale, Programme Mentor #ECFTeamSpeaks