स्त्री -पुरुष समानतेच्या दिशेने वाटचाल करताना: Experiences from the Field
Priyanka Siddhe, a part of the Research, Development, and Evaluation team at Equal Community Foundation writes about her experiences from the field while engaging with boys in our communities in Pune.
आजकाल स्त्री- पुरुष समानता या विषयावर पुष्कळ चर्चा होताना दिसते. वरवर पाहता समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे असा आभासही होतो, मात्र प्रत्यक्षात अजूनही समाजामध्ये छोट्या- छोट्या गोष्टींसाठी मुलींना खूप संघर्ष करावा लागत आहे. महिलांचा सहभाग विविध ठिकाणी आहे असे दिसते पण तो सहभाग घेत असताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलींना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे छेडछाड. दिवसेंदिवस समाजामध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रोजच्या वृत्तपत्रामध्ये याविषयी एखादी तरी बातमी नक्कीच वाचायला मिळते. अशी एखादीच मुलगी असेल जी छेडछाडीच्या समस्येला सामोरी गेलेली नसेल. छेडछाड़ म्हटले की डोळ्यासमोर खूप घटना उभ्या राहतात. ज्यामध्ये मुलींना नावावरून छेडण्यापासून ते जीवघेण्या कृत्यांपर्यत छेडछाडीचे स्वरूप भयावह आहे.
नेमकं छेडछाड म्हणतात तरी कशाला? काय स्वरूप आहे? कोण कोणासोबत छेडछाड करतात?
या सर्व प्रश्नाची उत्तरे मला मी सहभागी झालेल्या चर्चेदरम्यान चैत्रबन वस्तीमध्ये मिळाली. येथे इक्वल कम्युनिटी फाउंडेशन (ECF)तर्फे लीडरशिप कार्यक्रमाच्या मुलांनी एक गटचर्चा (FGD) आयोजित केली होती. यामध्ये मुलांनी मुलींसोबत काही विषयांवर चर्चा केली. सदर गटचर्चे साठी १२ मुले व ७ मुली उपस्थित होत्या. या चर्चेसाठी उपस्थित असणाऱ्या मेंटॉरने मुलांना ही गटचर्चा प्रभावीपणे घेण्यास मदत केली.
मुलींना सुरुवातीला इक्वल कम्युनिटी फाउंडेशनच्या समानतेसाठीची कृती (AfE) या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. सुरुवातीला मुलांनी वस्तीमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी मुलींना विचारल्या. यामध्ये मुलींनी वस्तीत होणारा पाणीपुरवठा, वैद्यकीय सुविधेसाठी येणारी व्हॅन, अंगणवाडी व त्यांच्याकडून मिळणारा पौष्टिक आहार, वस्तीतील लोक व त्याची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आणि त्यांच्यामधील नातेसंबंध हे चांगले असल्याचे सांगितले.
यानंतर वस्ती मधील मुलींना येणाऱ्या समस्या सहभागी मुलांनी जाणून घेतल्या. या समस्यांमध्ये मुलगा व मुलगी म्हणून केला जाणारा भेदभाव अर्थातच, स्त्री – पुरुष असमानता या विषयी मुलींनी चर्चा केली, मुलींच्या मते ही वस्तीतील खूप गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. “ घरामध्ये मुलींना जास्त काम करायला सांगितले जाते परंतु मुलगे त्यांनी जेवण केलेले ताट सुद्धा उचलत नाहीत” असे मत एका मुलीने व्यक्त केले. मुलांना घरात कुठलेही काम सांगितले जात नाही. मात्र मुलींना खूप कामे सांगितले जातात. तसेच मुलींना शालेय शिक्षण फार कमी मिळते. मुलींना इच्छा असुनही मनासारखे शिकता येत नाही. मुलांना मात्र जास्त शिक्षण घेण्याची मुभा दिली जाते. मुलींना भविष्यात काय बनायचे आहे याबाबत त्यांचे मत विचारात घेतले जात नाही, असे मत एका मुलीने वक्त केले. तसेच, मुलींची लग्न वय वर्षे १८ पेक्षा कमी असेल तरी बर्याचदा करून दिली जातात. त्यांना शिकण्याची इच्छा असेल तरी शिकू दिले जात नाही. मुलींच्या या मतावर मात्र काही मुलांनी आक्षेप घेत विचारले की “आजकाल असे फारसे दिसत नाही मग तुम्ही कशावरून म्हणता की मुलींची लग्न लवकर होतात? पूर्वीच्या काळी तर बाल विवाह होत असत, आता तशी परिस्थिती नाही” यावर थोडी चर्चा झाली आणि चर्चे दरम्यान त्यांच्यापैकी एका मुलानेच उदाहरण दिले कि मुली म्हणतात त्यात तथ्य आहे, त्यांच्याच गल्ली मधील एका मुलीचे लग्न लवकर करण्यात आले त्यामुळे मुलींची अजूनही लवकर लग्न केली जातात यात तथ्य आहे. यावर त्या मुलाने असे मत मांडले की, लवकर लग्न झालेली मुलगी ज्या गल्लीत रहात होती, त्या गल्लीच्या बाहेर काही मुले थांबत होती ती मुलगी आणि मुले एकमेकांकडे बघून हसताना तिच्या घरच्यांपैकी कोणीतरी बघितले, आणि या गोष्टीवरुन तिचे लग्न ठरवण्यात आले.
यात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुलींचे लग्न लवकर करून देण्यामागचे मुख्य कारण छेडछाड हे आहे. या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा मुलगे व मुलींनी केली, मुलींनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सांगितल्या आणि यातील काही समस्यांच्या मुळाशी गेलो असता त्याचे कारण मुलींवर होणारी छेडछाड हे आहे असे ठळकपणे लक्षात येते. यावर मुलींनी त्यांच्या आजूबाजूला घडत असलेले प्रकार, प्रवास करत असताना येणारे अनुभव, वस्ती मध्ये कॉलेज, शाळा व कामाला जाता-येता येणारे अनुभव, मुले मुलींची छेड कशाप्रकारे काढतात हे सर्व मुलींनी सांगितले. टक लाऊन बघणे, अनोळखी असतानाही बघुन हसणे, कपड्यांवरून शेरेबाजी करणे अथवा चिडविणे, शिट्या मारणे, टोमणे मारणे किंवा वेगळ्या नावाने हाक मारणे, गाणी म्हणणे, चिठ्या देणे, पाठलाग करणे अशा प्रकारे छेडछाड केली जाते. मुलींनी मांडलेल्या या मुद्यांवर मुलांचे मत असे होते कि, मुली देखील मुलांसोबत छेडछाड करतात परंतु त्याचे स्वरूप वेगळे असते. फक्त पुरुषच चुकीचे नसतात तर स्त्रीयांची देखील चूक असते. त्या सुद्धा मुलांकडे बघतात, मुलांना चिडवतात, मुलांकडे बघून हसतात. हा मुद्दा मुलींनीदेखील मान्य केला यावर त्यांचे असे मत होते कि काही मुलीही मुलांना चिडवतात. चर्चेअंती मुलगा व मुलगी दोघेही छेडछाड करत असल्याचे सर्वांनी मान्य केले. पण यामध्ये मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वांना मान्य होते. यामुळे मुलींना खूप समस्यांना सामोरे जावे लागते, काही मुद्दे वरील माहिती मध्ये स्पष्ट होत आहेत मात्र तरीही त्यांना पुन्हा अधोरेखित करणे महत्वाचे वाटले कारण छेडछाडीचा खूप खोलवर परिणाम मुलींच्या आयुष्यावर होताना दिसून येतो. त्यांचे घराबाहेर पडणे बंद होते, शिक्षण थांबविले जाते, त्यांच्यावर अविश्वास दाखविला जातो, स्वतःच्या मुलींनाच दोष देण्यात येतो, यामध्ये दोषी मुलांना काहीच बोलले जात नाही, मुलींचे मत कोणीही ऐकून घेत नाही. परिणामी त्यांच्यावर अन्याय होतो.
पुढे वस्ती मध्ये काम करण्यासाठीही छेडछाड हा विषय घेण्यात यावा असे मुलींनी सुचविले. लीडरशिपच्या टप्प्यात असणारे मुलगे पुढे येणाऱ्या ऍक्शन इव्हेंट मध्ये छेडछाड या विषयावर वस्तीमध्ये कार्यक्रम घेतील.
सदर लक्ष-केंद्रित चर्चेमध्ये मुलांनी व मुलींनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला, दोघांमध्येही गांभीर्यपूर्वक चर्चा सुरु होती, कोणीही एकमेकांच्या मुद्द्यावर हसत नव्हते, समस्येचे गांभीर्य चर्चेतुन जाणवतं होते. मुली बोलताना खुप आत्मविश्वाने बोलत होत्या व त्यांना या समस्यांना कशाप्रकारे दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागते हे त्यातून समजत होते. “या चर्चे मध्ये आमच्या समस्या अशा पद्धतीने पहिल्यांदाच आम्हाला मांडता आल्या” याचे मुलींनी खूप कौतुक केले. सुरुवातीला वस्ती पातळीवर कार्यक्रम करताना मुलेच समस्या निवडून त्यावर कार्यक्रम करायचे, यावेळेस मात्र मुले मुलींशी चर्चा करून, मुलींना असणाऱ्या समस्यांवर काम करणार आहेत, हि नवीन कल्पना मुलींना आवडली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगे सुद्धा स्वतःचे मुद्दे न घाबरता उदाहरणे देऊन मांडत होते.
वरवर पाहता लोकांचे विचार बदलत आहेत असे दिसते. महिला सबलीकरण, त्यांचा होणार विकास, महिलांचा विविध क्षेत्रातील वाढता सहभाग यावर चर्चा केली जाते. मात्र वरील चर्चा ऐकल्यावर अजूनही महिला/ मुली खरचं सुरक्षित आहेत का? हा मुद्दा डोळ्यासमोर उभा राहतो.
मात्र नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे छेडछाडी मागील दुसरी बाजूही लक्षात घेणे तितचेच महत्वाचे आहे. बऱ्याचदा मुलं समाजातील काही दबावाला बळी पडून छेडछाड करताना दिसतात, जसे की छेडछाडीचा थेट संबंध मर्दानगीशी जोडण्यात आला आहे, त्यासाठी त्यांच्यावर जाणीवपुर्वक अथवा नकळत मित्रांकडून दबाव टाकण्यात येतो, तो एक मर्द आहे हे सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारची कृत्य करण्यास तो स्वतःला प्रवृत्त करतो. या सर्व बाबी कुठेतरी छेडछाडीचा पाया असल्याचे दिसून येतात.
याचे गांभीर्य लक्षात घेऊनच इक्वल कम्युनिटी फाउंडेशन हि संस्था १३ ते १७ वयोगटातील मुलांसोबत पुण्यातील वीस वस्त्यांमध्ये काम करत आहे. हे काम करत असताना इक्वल कम्युनिटी फाउंडेशनचे मुख्य ध्येय, लिंगभावाधारित होणाऱ्या हिंसेपासून जगाला मुक्त करणे व या दृष्टीने वाटचाल करत असताना भारतातील प्रत्येक मुलाला लिंगभाव समानतापूर्ण शिकवण देणे हे आहे. यामध्ये लिंगभाव, समानता, हिंसा, मर्दानगी, नातेसंबंध हे विषय शिकवले जातात. आजवरच्या संशोधानुसार स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायांमध्ये पुरुषांचा सहभाग जास्त असल्याचे आढळते. परंतु या विषयासाठी मुलांसोबत काम करणाऱ्या संस्था फार कमी आहेत आणि म्हणूनच इक्वल कम्युनिटी फाउंडेशन हि संस्था समस्येच्या मुळाशीच जाऊन काम करत आहे. व यासाठी किशोरवयीन मुलांसोबत दृष्टीकोन आणि वर्तवणूक बदला बाबत काम केले जाते. जेणे करुन याचा सकारात्मक परिणाम भविष्य काळात अनुभवास मिळेल.